पत्र क्र २४
कांचीपुरम ला शंकराचार्यांची प्रत्यक्ष भेट झाली. आणि काही विषयावर त्यांचे विचार ऐकायला मिळाले. त्यांचा एक विचार खुप आवडला आपल्या संस्कृतिबद्दल, आपण निसर्गाला आपल्या जीवनात किती महत्वाचे स्थान देतो ....
जगाच्या पाठीवर … कधीतरी कुठेतरी पत्र क्र २४ कांचीपुरम ला शंकराचार्यांची प्रत्यक्ष भेट झाली. आणि काही विषयावर त्यांचे विचार ऐकायला मिळाले. त्यांचा एक विचार खुप आवडला आपल्या संस्कृतिबद्दल, आपण निसर्गाला आपल्या जीवनात किती महत्वाचे स्थान देतो . अगदी नदी ला पण आपण माता मानतो, तिची पूजा करतो. प्रत्येकवेळला नदी बघताना नकळत नतमस्तक व्हायला होते. नदी भोवती सगळी अर्थव्यवस्था फिरत असते. नदी मला खुप आवड़ते. शांत आणि समृद्ध! एकेक नदी आठवताना , इतक़या गोष्टीनी गर्दी केली मनात, पॉवर प्रोजेक्टस, खुप सुंदर सुंदर पुल, धरण, किती नी काय. आणि प्रत्येक नदिला तिचि स्वतःची एक कहाणी असते. लहानपणी त्र्यंबक च्या गोदावरीनदीच्या उगमाची कथा आईला अनेक वेळा सांगायला लावायचो. आणि गंगाद्वार हुन कुशावर्त , चक्रतीर्थ करत नाशिकहुन ड़ौलात जाणारी!! नांदूर मधमेश्वर ला थोड़ी अडवलेली. पण तिथे त्या पात्रात किती जलचर वास करतात. अनेक सुंदर पक्षी पण भेट देतात. भर पावसाळयात दुथडी भरुन वाहणारी. अशीच दक्षिणेत कावेरी. मला कावेरी लक्षात राहिली ती शिवसमुद्रम ला तीच्यावर असलेल्या पॉवर प्लँट मुळे. रोपवे नी उतरून जाउन तो भव्य प्लँट बघताना जीव दडपत होता अगदी. कोयनेचा प्रकल्प पण असाच लक्षात राहिला. नर्मदा परिक्रमा हां माझ्यासाठी अतिशय कुतूहलाचा विषय. नर्मदा नदी किती पवित्र मानली जाते. ते पावित्र्य अनुभवायला तिच्या किनारी जायलाच हवे. महेश्वर ला पोचलो तो संध्याकाळ झाली होती. हातात बराच वेळ होता , चला खरेदीला जाऊ. तर हॉटेल चा रिसेप्शनिस्ट म्हणाला , खरेदी तर उद्या पण कराल, सायं आरती मात्र चूकवु नका. मग गेलो. इतके भारावलेले वातावरण !! नर्मदामैय्या च्या प्रति भक्ति , प्रेम, श्रद्धा ओतप्रोत भरलेली. तो अनुभव अगदी अविस्मरणीय! उज्जैन ला क्षिप्रा मात्र सुकलेलि होती. थोड वाईट वाटल. दक्षिण काशी म्हणजे प्रकाशा ला तापी अनेकदा विविध रूपात बघितली. पण दरवेळी ती नवीन वाटते. कधी सुकलेली असते तर कधी ख़ळाळत वाहत असते, दोन्ही तीरावरचा प्रदेश सूजलाम करत. देवी मानतो, आई मानतो पण आपण नदी ख़राब का करतो तेच कळत नाही. दिल्लीत यमुना केविलवाणी भासली मला. हल्ली गंगा पण सुंदर झाली आहे पण आम्ही स्वच्छ गंगा बघायचो बाकी आहोत अजुन. असंख्य लहानमोठया नदया पार केल्या. शांत वाहणाऱ्या , खळाळत, धावत समुद्रात सामावणाऱ्या . हिमालयात दिवसा साथी भासणाऱ्या झेलम, चीनाब, बियास , अंधारात कधी कधी घाबरवतात. पण हिमालयात क़ायम एक तरी नदी आपल्या बाजूने , दरीतुन वाहत असते. स्वच्छ सुंदर शुभ्र ज़ल घेउन. हिरवी तिस्ता तर इतकी छान भासते. राफ़्टिंग ची मज़ा तिस्तावरच! काश्मीरच्या नद्यांचे नाव आपल्या परिचयाचे असते. रावी, चीनाब, बियास कारण भूगोलात कधीतरी वाचलेले असते. मज़ा तर उत्तराखंड मधे, काली नदी, गोरी नदी , पीली नदी!! गोरी गंगा, ढवळी गंगा!! नाव काहीही द्या हो, प्रत्येक नदी सुंदर, दोन्ही काठ कवेत घेउन मजेत वाहणारी. एका नदी बद्द्ल लहानपणी पासून आदरयुक्त भिती होती , ती म्हणजे ब्रम्हपुत्रा!! आसामला गेलो तेव्हा पहिल्याच दिवशी धावलो, तिला बघायला. केवढे मोठे पात्र!! नज़रेच्या टप्प्यात फ़क्त पाणी. तिथल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग. परशुरामा ने आई चे शिर धड़ अलग केल्यानंतर आपला परशु ह्या नदीत धुतला , असे म्हणतात. दर वर्षी नित्य नेमाने खुप पूर येणारी नदी. काठ सोडुन दुरवर जाउन नुक़सान करणारी. असे असले तरी, वर्षभर जनतेला जी मदत होते ती स्मरून लोक आपले जीवनचक्र तिच्याभोवती चालुच ठेवतात.
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.