पत्र क्र २३
हिमालयात जशी बर्फ़ाची खुप मज़ा अनुभवली तशीच परदेशी पण खुप ठिकाणी अनुभवली. बर्फ़ बघायला Switzerland एकदम मस्त. तसा सर्वच यूरोप छान . Canada काय कींवा अमेरिकेचा काही भाग काय. बऱ्याच ठिकाणी बर्फ़ अगदी...
जगाच्या पाठीवर …. कधीतरी कुठेतरी पत्र क्र २३ हिमालयात जशी बर्फ़ाची खुप मज़ा अनुभवली तशीच परदेशी पण खुप ठिकाणी अनुभवली. बर्फ़ बघायला Switzerland एकदम मस्त. तसा सर्वच यूरोप छान . Canada काय कींवा अमेरिकेचा काही भाग काय. बऱ्याच ठिकाणी बर्फ़ अगदी आम बात! वर्षाचा बराच काळ सूर्यदर्शन पण दुर्मीळ असते अशाही जागा आहेत. त्यामुळे जरा जरी सूर्य दिसला की अगदी वेडे होतात लोक. माउंट टिटलिस वर मस्त पूर्ण दिवस घालवणार म्हणुन पोचलो. सर्वदूर बर्फ़ पसरलेला. त्यांना बर्फाची खुप सवय असते. आपणच गोठतो . लोक मस्त स्कीईंग करत होते. बरोबरची मैत्रिण उगाच काही स्टाइल मधे फ़ोटो काढ़ायला गेली. थंडीसाठी घातलेला कोट बाजुला ठेवला आणि ही पोज देतेय. तोवर जोरात वारा आला आणि हिचा कोट दरित. आता काय करणार? बर, हिच्यासाठी कोण दरीत उतरणार न . पण स्कीईँग साठी पोस्ट ठोकणाऱ्या एकाला तो दिसला आणि आणला बाबा त्याने वर. अमेरिकेतले यलोस्टोन नॅशनल पार्क. वर्षाचा बराच काळ बर्फाच्छादित असते. मे मधे जरा बर्फ़ कमी झाल्यावर प्रवाशासाठी उघड़तात. पण त्यांना जराही बर्फ़ वाढलेला दिसला की लगेच बंद करतात. आम्हाला मिळाले उघड़े. आत शिरल्यावर थोड्या उंचीवर पोचलो आणि आजुबाजुला बर्फ़. चांगला सात आठ फुट ऊंच. गाडया थांबवल्या गेल्या. पुढ़े रस्ता क्लीअर करण्याचे काम चालु होते. त्यांनी सोडेपर्यंत सगळेच जण बर्फ़ात खेळून घेत होते. आत गेलो. संध्याकाळची भ्रमंती करुन जेवायला पोचलो. बाहेर उणे ५ तापमान पण आत एकदम टेम्परेचर कंट्रोल मधे. मग फ़ारसे काही जाणवत नाही. पण बाहेर पडल्यावर गाड़ी पर्यंत पोचेपर्यंत ब्रम्हाण्ड आठवले. आणि “खुप थंडी होती बाहेर “ ऐवजी आम्ही आता “अगदी यलोस्टोन झालेय बाहेर “ असच म्हणु लागलोय. स्कॉट्लंडमधले सर्वात उंच शिखर बेन नेविस. बहुतेक काळ बर्फ़ाच्छादित असते. तिथले वैशिष्ट्य म्हणजे छान सपोत अशी चढ़ण आहे आणि त्यामूळे सतत स्कीईंग , माउंटेन बाइकिंग वगेरे चालु असते. तळात visitor सेंटर आहे. तिथे छान शांतता असते. शिखरावर काय चालु आहे त्याची थोड़ी पण कल्पना येत नाही. आम्ही पोचलो. तिथे रोपवे आहे वर जायला. पण ते तिकिटच देईनात. वर बर्फ़ाचे वादळ चालु होते. बराच काळ प्रतिक्षेत गेला. मग वर सोडले. इतका जास्त बर्फ़ होता वर, नुकताच पडलेला , त्यामुळे एकदम भूसभुशित!! बर्फ़ पड़ताना अनुभवण खुप वेगळ होत. स्कॉट्लंडमधले राजघराण्याचे उन्हाळयातले घर बालमोराल कासल! आधी appointment बुक करुन ज़ायचे असते. दुपारि दोन चीं आमची वेळ होती आणि अड़िच ची शेवटची बॅच. निघालो तेव्हा आमची पोचण्याची अंदाज़े वेळ दुपारि एक दाखवत होते. तासभर काय करायचे अशी चर्चा सुरु झाली. पण आधी पोचु मग ठरवू म्हणत रस्ता पार करत होतो. आणि अचानक बर्फ़ पडु लागले. सुरुवातीला मज़ा आली. जसजसा ज़ोर वाढला, गाड़ी चालवणे कठिण होऊ लागले. आणि एक तास काय करायचे अशी चर्चा आता वेळेत नाही पोचलो तर काय करायचे ईथवर आली. मग फ़ोन केला आमचा प्रॉब्लम सांगितला मग त्यांनी उशिर झाला तरी चालेल असे सांगीतले. क़ापसासारखा बर्फ़ हवेत नुसता विखरत होता. अगदी छोटेछोटे क़ापसाचे पूंजके आकाशातुन इतस्तत: पसरत होते. तिथुन पुढ़े निघालो. बर्फ़ाचे मोठमोठे डोंगर पार करत होतो. कापुस अजुनही पडतच होता. रस्त्याच्या दुतर्फ़ा आठ दहा फुट बर्फ़. काही वेळापूर्वी साफ़ केला होता म्हणुन जाता येत होते. संध्याकाळ व्हायला लागली. आमचे मुक्कामाचे ठीकाण दिडतासावर होते. दोन्ही बाजुला बर्फ़ाचे ढीग आणि आम्ही पुढ़े जायचा प्रयत्न करतोय. जो अगदी जवळचा मार्ग होता, त्यावर अर्धा तास पुढे गेलो, बर्फामुळे रस्ता बंद!! मागे आलो दूसरा जरा लांबचा रस्ता धरला. थोड़े पुढे गेलो, तो ही रस्ता बंद! पुन्हा मागे , तीसरा रस्ता फ़ारच लांबचा होता. तोवर अंधार झाला होता चांगलाच. आणि बाजुच्या उंचचउंच बर्फाच्या भिंती भयावह वाटत होत्या. दिड तासाऐवज़ी चांगला सहा तास प्रवास करुन पोचलो शेवटी मुक्कामी.
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.