पत्र क्र २०
पाऊस सगळयाना च हवाहवासा वाटतो. कुठेही जा, चांगलाच वाटतो. हिथ्रो वर उतरलो तो बाहेर रिमझिम!! दुसऱ्या दिवशी फिरायला गेलो, मस्त पाऊस. इटन कॉलेज चा तो सुंदर परिसर तर अजुन सुंदर वाटत होता पावसामुळे. तिथला...
जगाच्या पाठीवर …. कधीतरी कुठेतरी पत्र क्र २० पाऊस सगळयाना च हवाहवासा वाटतो. कुठेही जा, चांगलाच वाटतो. हिथ्रो वर उतरलो तो बाहेर रिमझिम!! दुसऱ्या दिवशी फिरायला गेलो, मस्त पाऊस. इटन कॉलेज चा तो सुंदर परिसर तर अजुन सुंदर वाटत होता पावसामुळे. तिथला बोट क्लब खुप छान आणि भव्य आहे. समोर सुंदर नदी , आजुबाजूला भव्य आख़िवरेखिव बगीचे आणि भुरभुरणारा पाऊस!! छोट्या छोट्या ग़ावामधुन जात असताना असाच सोबत येणारा! विडंसर भागाचे सौंदर्य अधिकच खुलवणारा!! अमेरिकेत उतरलो तेव्हा पण पाऊस. Stanford यूनिवर्सिटी चीं पहिली भेट अगदी लक्षात राहिली. त्यांची फ़ेमस ,”डिश” म्हणजे डोंगरावरचे पठार , बघायला गेलो तर पाऊस वर जाऊ देईना. आतला भव्य परिसर, जरा उतरून पायी जाऊ, तर कसल काय? सुंदर दगड़ी इमारती लांबुनच बघितल्या. आणि पाऊस सोबत घेउनच योसेमिटी गाठले. इथून निघायच्या अगदी आदल्या दिवशी मुलाने सांगीतले, रेनकोट आणा, पाऊस आहे. ऐन उन्हाळयात दादर च्या दुकानातुन शोधुन आणले. तिकडे फिरताना बघितले, आमचे रेनकोट जाड क़ापडाचे, छान अंगालगत बसलेले, व्यवस्थित होते मात्र इतर सगळे लोक चायनिज बनावटीचे, भले थोरले , अगदी पातळ पण रंगीबेरंगी असे डगले घालूनही निम्मे भिज़तच होते. आणि बरेच जण आमच्या रेनकोट कडे आश्चर्याने बघत होते. एक जण न राहवुन आलीच विचारायला, कुठे मिळतात ग असे रेनकोट. मी पण अभिमानाने , मेड़ इन इंडिया, सांगीतले आर्चेज़ नॅशनल पार्क फिरताना पण आमचे रेनकोट सगळयांचें लक्ष वेधून घेत होते . कस एकदम सेलेब्रिटी झाल्यासारख़े वाटत होते. इतके हसत होतो आम्ही. पण प्रत्येक जण कुतूहलाने बघत होता, कोणी येउन हात लावुन बघे, कोणी nice raincoat म्हणे. शेवटी तर एकिने ईथे कुठे मीळत नाही ग तू पाठव न, अस सुद्धा सूचवले. आमची मात्र करमणूक झाली खुप. आर्चेज़ हून सॉल्ट लेक सिटी चा रस्ता तसा एकदम निर्जन होता. छान डोंगरातुन ज़ाणारा. मजेत जात होतो तर अचानक अंधारुन आले आणि इतका धो धो बरसू लागला, की काही दिसेना. तसेच थोड़े पुढे गेलो आणि मज़ा म्हणजे अगदी बटण दाबून बंद करावा तसा पाऊस एकदम संपला, मागे बघावे तर पाऊस दिसत होता आणि पुढे उन!! वीयट्नाम च्या ट्रा सु बर्ड पार्क मधे पण पाऊस आधी पोचला होता आमच्या . तिथे बोटीतुन फिरायचे होते. पण पार्क च्या आत जायला मोठया बोटी चालत नाहीत . ३ ठिकाणी बोट बदलावि लागतें. पाऊस इतका की बोट बदलताना त्रेधा तिरपीट उडाली नुसति हिंद महासागरातला सुंदरसा बेटांचा समूह मालदीव. स्वच्छ, नितळ निळा , अगदी पारदर्शक काचेसारख़े पाणी असलेला किनारा. डोळयाचे पारणे फिटते. खोल समुद्रात , स्पीड बोटने जाउन डॅालफिन्स बघायला जाता येते. साधारण ४,५ तासाची सफ़र असते. हुलहूँमाले चा किनारा सोडला तेव्हा साफ़ हवा, सुंदर सूर्यप्रकाश होता. स्पीडबोट चालवणारा पोरगा छान जॉली होता. त्याला हिंदी तोड़के मोड़के येत होते आणि बम्बई से आया मेरा दोस्त, हे गाणे पण येत होते. मज़ा करत तास दिड तास प्रवास झाला. खुप दूर पोचलो. मस्त डॅालफिन्स बघत होतो. तेवढ्यात समुद्राने रूप पालटले. एकदम अंधारुन आले. भयानक वारा सुटला. मोठे मोठे थेंब बरसू लागले. समुद्र पण खवळला. बोट हेलक़ावे खायला लागली. बापरे! सगळे देव आठवले. नावाड्याला पण भिती वाटलेली दिसत होती कारण तो एकदम गप्प झाला. किनारा खुप दूर होता. पाऊस तर वेडा झाला होता. आम्ही पण गप्प झालो. त्याने सांगीतले समुद्र असाच असतो. कधी बदलेल सांगता येत नाही. तासभराचे तांडव . कसेबसे किनाऱ्यावर पोचलो. थोड्याच वेळात पाऊस ही थांबला. आम्हाला एक अविस्मरणीय थरारक अनुभव देउन …….
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.