पत्र क्र १९

पाऊस आला वारा आला पान लागले नाचु …… पानच कशाला, सगळयाना च आवडतो पाऊस! कोणी किती पावसाळे बघितले त्यावर त्याला किती अनुभव आहे ते ठरत नाही का? जितका सुंदर तितकाच रौद्र रुपपण तो धारण करु शकतो हां....

कीर्ती वडाळकर
||3 min read

जगाच्या पाठीवर …. कधीतरी कुठेतरी पत्र क्र १९ पाऊस आला वारा आला पान लागले नाचु …… पानच कशाला, सगळयाना च आवडतो पाऊस! कोणी किती पावसाळे बघितले त्यावर त्याला किती अनुभव आहे ते ठरत नाही का? जितका सुंदर तितकाच रौद्र रुपपण तो धारण करु शकतो हां. प्रवासात तर तो कितिदा किती विविध रूपात भेटलाय. अगदी माळशेज़ घाटात , लोणावळयाला, माथेरानला पावसाला भेटायला मुद्दाम जाउन आलो कधी, तर कधी पाऊस अचानक भेटला. तसा मुंबईकरांना पाऊस दर वर्षी खुप हैराण करतो, पण तरी तो हवाहवासा वाटतो. गोव्यात , मज़ा म्हणुन , दुचाकी भाड़याने घेउन, लांबवर फिरायला गेलो होतों. हवा स्वच्छ होती, निघालो तेव्हा. आजुबाजूचा सुंदर परिसर बघत निघालो. थेट शांतादुर्गा मंदिरात. स्कूटर बाहेर लाउन आत जातच होतों आणि अचानक अंधारुन आले आणि लगेच धो धो पाऊस कोसळायला लागला. आत देवीचि पूजा आणि शृंगार करणे चालु होते. बाहेर धो धो पाऊस आणि आत ते पुजारी शांतपणे देवीला सजवत होते सुंदर फुलांनी. जाईच्या फुलांचा घमघमाट आसमन्तात भरुन राहिला होता. बाहेर पाऊस काही थाम्बायचे नाव घेईना. मग शांत पणे बसून राहिलो. सर्व सजावट झाली. खुप सुंदर दिसणारे देवीचे रूप डोळयात साठवून ठेवतच निघालो. पाऊस चक्क थाम्बला होता, जणु काही आम्ही ती पूजा पूर्ण बघावी म्हणुनच आला होता तो. असा तर पुण्याला जाताना घाटात सुंदर पाऊस अनेकदा भेटला. पण ऐन उन्हाळयातले हिमालयातले त्याचे रौद्र रूप चांगलेच लक्षात राहिले. अलमोरा सोडुन डिडीहाट कडे निघालो. सकाळची छान प्रसन्न वेळ. जेमतेम १७० किलोमीटर चा प्रवास. अगदी आरामात जाऊ म्हटल तरी संध्याकाळपर्यंत नक्की पोचलो असतो. आजुबाजूचे सृष्टि सौंदर्य बघत जात होतो. साधारण शंभर किलोमीटर वर पिठोरागड . तिथे थोड़े फिरू मग पुढ़े जाऊ, अशी चर्चा करत हिमालयातला वळणा वळणा चा , चढ़ उताराचा घाट पार करत होतो. तिथला उन्हाळा. छान वाटत होते. पिठोरागड ३०, ३५ किलोमीटर लांब असेल, हवामान अचानक बदलले. नभ मेघांनी आक्रमीले. आणि लगेच धो धो बरसायला सुरूवात. आधी छान वाटले. पण पाण्याबरोबर मोठमोठया गारा पण मारू लागल्या. काही सेकंदात पाणी नाही, बर्फ़च पसरू लागल. पुढ़े जाणे अशक्य झाले. वळणावर एक छोटे हॉटेल दिसले. बरेच लोक आसरा घेउन होते. पण गाड़ीतुन बाहेर पड़ायचे म्हणजे कठीण काम, बाहेर पडणारा पाऊस, गारा, बर्फ़ त्यानी तापमान खुप कमी होउन कुड़कुड़ होत होते. कसेबसे पोचलो त्या हॉटेलात. बरेच लोक तिथे असेच जमत गेले. साधारण दिड दोन तास निसर्गाचे ते तांडव बघत बसलो. मग पाऊस जरा कमी झाला. बरोबरच्या लोकानी सगळे सोबत जाऊ असे सूचवले. मला कळेना , असे का? तर ह्या एवढ्या भयानक पावसानंतर रस्ते खचतात. दरडी कोसळतात. जमलेल्या बर्फ़ावरून गाड़ी घसरते, काहिही होऊ शकते. म्हणुन काही गाडया एकत्र असल्यास बरे. बापरे , इतकी भिती वाटली. उरलेले ३०, ३५ किलोमीटर अगदी हळुहळु पार केले, पुढचा तास दिड तास लावत. डिडीहाटला तिथले हॉटेल मॅनेजर वाट पहात होते कारण त्यांनाही ह्या पावसाचीं बातमी कळली होती . उशीरा का होईना आम्ही सूखरूप पोचलो हयाचा त्यांना ख़रच खुप आनंद झाला . असाच अजुन एक धुवाँधार पाऊस चेरापूंजी चा. भूगोलात पाठ केल्याप्रमाणे ख़रच तिथे पडणारा खुप पाऊस खुपच असतो. दोन दिवस तो भाग फिरत होतो. नुसत ऊन. असणारच न, मे चा महीना होता. सकाळीच निघालो होतो. आज खुप सुंदर जागा दाखवतो म्हणत आमचा उत्साही ड्राइवर गाड़ी काढ़ून तयार होता. नाव काय रे जागेच? तर म्हणे का खो रामहां !! हे कसले रे नाव? अशी प्रश्नोत्तरे चालु झाली आणि काळया काळया ढग़ानी आभाळ भरुन गेले. आणि बघता बघता टप्पोरे थेंब बरसू लागले. इतका प्रचंड पाऊस की काहीच दिसेना. का खो रामहां ला तर पोचलो. पण पाऊस बरसतच होता. तासभर बरसला चांगला. पण नंतर छान लख्ख उजाडले, जणु काही घडलेच नाही .

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments