पत्र क्र २
एकदा मिळालेला सामानाचा धड़ा चांगलाच लक्षात राहिला. त्यानंतर अनेक प्रवास केले पण आपल्याला उचलता येइल इतकेच सामान घ्यायचे अशीच सवय लागली. अनेक वेळा केलेल्या विमानप्रवासामुळे तर त्यावर आपोआपच बंधन आली....
जगाच्या पाठीवर ...... कधितरी कुठेतरी पत्र क्र २ एकदा मिळालेला सामानाचा धड़ा चांगलाच लक्षात राहिला. त्यानंतर अनेक प्रवास केले पण आपल्याला उचलता येइल इतकेच सामान घ्यायचे अशीच सवय लागली. अनेक वेळा केलेल्या विमानप्रवासामुळे तर त्यावर आपोआपच बंधन आली. आणि कामानिमित्त एकटीला प्रवास करावा लागला, तेव्हा तर अगदी कमीतकमी!! सेमिनार निमित्त लंडनला ज़ायचे ठरले. भाऊ असतो तिथे. मग त्याने तर ५ दिवसाच्या सेमिनार चे रूपांतर चांगल्या एक महिन्याच्या ट्रिप मधे केले. आठवड़ाभर जरा निवडक यूरोप बघून ये. स्कॉट्लंड ला जाउन ये. ब्रिटिश कंट्रीसाइड बघुन ये , नंतर दिवाळी करुन मगच परत जा. किती वेगवेगळे प्रसंग!! पण सामानाच्या खुप सूचना! जास्ती नको आणु, ईथे काय कपड़े ख़राब होत नाहीत, घाल तेच परत परत नाही तर ३० दिवसांचे ९० कपड़े आणशिल , बूट पण एकच आण. ईथे मी थंडी चे कपड़े देइन , इकड़े लोक अगदी कमीतकमी सामान घेउन फिरतात वगेरे. तरी हे नको ते नको करता एक छोटी सूटकेस भरली. सगळयाना चेष्टेचा विषय च झाला. ५ दिवस सेमिनार आटपुन, थोड सामान एका छोट्या बॅगेत भरुन , तिथल्या एका ग्रुप बरोबर यूरोप बघायला निघालो. माझी बॅग बघत भाऊ जरा ओरडलाच. आम्ही सहप्रवाशांची वाट बघत थांबलो. एक जोड़पे आले . भल्या मोठया २ सूटकेसेस ढ़कलत !! किती दिवस रहाणार होते क़ुणास ठाउक? मी भावाकडे सूचक कटाक्ष टाक़ला. प्रवास सुरू झाला. दिवसभराची भ्रमंति करुन मुक्कामी आलो. सुंदर संध्याकाळ, गुलाबी थंडी. भव्य बागा आम्ही छान फिरायला निघालो. बरोबरचे जोड़पेसुद्धा आले . पण पेहेराव पूर्ण बदललेला, छान चालायचे बूट, व्यायामाचे कपड़े, हलकामेकप !! रात्री जेवायला सगळे जमलो बघतो तर हे पून्हा तीसऱ्याच वेषात! आणि असे रोज़ चाले. अर्थात् अनेक कारणे देत मला सामान कमी करायला लावणाऱ्या भावाचे मी परत आल्यावर काय केले ते सुज्ञास सांगणे न लगे . लगेचच अमेरीकेला पण जावे लागले. तेव्हाही तिच कथा!! मुलाच्या हज़ार सूचना, सामानाचा विडीओ पाठव, हे नको आणु अन ते ठेव बाजुला. अग एवढ़ी फिरतेस पण अजुन कसे कळले नाही तुला की परदेशी लोक खुप कमी सामान घेउन फिरतात ते, वगेरे. Stanford यूनिवर्सिटीला मुलाबरोबर एक दिवस राहुन तिघे आम्ही भ्रमंतिला निघालो. भला मोठा प्रवास आखला होता. मी शाकाहारी, कुठे काही मिळाले नाही तर ? म्हणुन चिवड़ा, चक़ली, लाडु अशा जिनसांची एक बॅग झाली होती. आणि त्यावर माझे बौद्धिक चालु असताना बाजूने एक फ़ोर व्हिल ड्राइव मोठी व्हॅन , मागे दोन सायकली आणि दोन बोटी अडकवलेली दिसली. मी जरा चक़्रावले, तोवर एक फ़ोर व्हिल ड्राइव, मागच्या खिडकीत दोन कूत्रे, उघड़या डिक्कीत दोन सायकली, मागे दोन बोटी, अरे काय हे? हयात भर घालत, अनेक सहप्रवासी मजेत चालले होते. Grand Canyon ला पोचलो. एक़ा ठीक़ाणी फिरत असता, एक मोठी camper व्हँन येउन उभि राहिली. त्यातली महिला उतरली,२ कुत्री बाहेर काढली, पुरुषाच्या हातात दिली. त्याने ती दोन कुत्री बरोबरच्या डॉग कार्ट मधे ठेवली. Camper मधुन टेबल, २ ख़ुर्चया, वर घालायला सुंदर क़ापड. एक ड्रिंक चा can, ग्लास, प्लेट्स काय काय मांडायला सूरु केले. ती बाई आतुन छान तयार होऊन आली तोवर. गाड़ीला बोटी , सायकली होत्याच. मी तिरकसपणे मुलाला विचारले, किती दिवसासाठी आलेत रे हे लोक? तो शुक्रवार होता आणि साहजिकच तो त्यांचा वीकेंड होता. दर शुक्रवारी दुपारनंतर निम्मी अमेरिका अशीच बाहेर पड़ते हाताला लागेल ते सर्व सामान घेउन !!!
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.