पत्र क्र १७

ऊन लागणारच . लागू दे, चांगलीच लक्षात राहते न ती जागा मग. सौराष्ट्राचीं ट्रिप! ऐन में महीना होता. सूर्य तर आग ओकणारच. राजकोट हुन निघुन पहिला टप्पा जामनगर. तापमान ४० डिग्रीज़. गाड़ीतुन उतरुन त्या...

कीर्ती वडाळकर
||2 min read

जगाच्या पाठीवर … कधीतरी कुठेतरी पत्र क्र १७ वर्षाच्या विविध ऋतुमधे प्रवास केले. प्रत्येक ऋतुचे आपले वैशिष्ट्य असते, मज़ा असते आणि त्रास पण असतो. कधी आवड़ म्हणुन तर कधी सवड होती म्हणुन तो ऋतु निवडला. पण जे काही समोर आले त्यात आनंद घेतला. भारतात साधारण उन्हाळा सर्वदूर असतो. आपण त्यापासून दूर पळायला थंड हवेची ठीकाण शोधतो. पण सांगू का उन्हाळयाची पण स्वतःची अशी एक शान, ज़रब असते. आपल्याकडे सुट्टया ऐन गरमीत लागतात, मग काय करणार न? कुठेतरी ऊन लागणारच . लागू दे, चांगलीच लक्षात राहते न ती जागा मग. सौराष्ट्राचीं ट्रिप! ऐन में महीना होता. सूर्य तर आग ओकणारच. राजकोट हुन निघुन पहिला टप्पा जामनगर. तापमान ४० डिग्रीज़. गाड़ीतुन उतरुन त्या राजवाड्यात ज़ायचे म्हणजे कठीण काम. जैन मंदिर पण नुसते तापलेले. उन्हात जास्तच छान दिसत होते. पुढ़े द्वारका, सोमनाथ असेच गरम. गिर ला मात्र जरा बरी परिस्थिति. पण ऊन काय असते ते अगदी चांगले अनुभवले. सौराष्ट्राच्या अनुभवापेक्षा अजुन जास्त गरमी आमची राजस्थानात वाट बघत होती. खुप मोठा दौरा होता. अर्थात् एक सेमिनार पण होताच जोड़ीला, उदयपुरचा. मग त्याआधी, नंतर फिरायला हवेच न? ख़रतर में महीना संपत आला होता. वाटले, इतक़ काय घाबरायचे? जाऊ . जयपुर हुन सारिस्का बघून भरतपुरला पोचलो. जयपुर ४२,सारिस्का ४५ आणि भरतपुरला चांगले ५० डिग्रीज़ तापमान!!! इतकी भयानक परिस्थिति. ख़ोलीत एसी आणि कुलर दोन्ही लावुन जीवाची काहिली होत होती. मात्र पक्षी खुप बघितले. तिथुन आग़्रा जवळ , तर चला ताजमहल पण बघूनच येऊ. तिथे पादत्राणे बाहेर काढ़ा म्हणे, आणि तापलेल्या संगमरवरावरून जाताना ब्रम्हाण्ड आठवले. नंतर कळले की तिथे बूटकवर मिळतात, अरे देवा पाटी तरी लावायची न? लोक चाँदण्यात ताज बघतात, आम्हाला मात्र ताज नी दिवसा चांदणे दाखवले आमचे नागपुर तर क़ायम उन्हाळयासाठी बदनाम पण भारतभर अशा अनेक जागा आहेत जिथे भयानक उन्हाळा तापतो. जोधपुरला पण मस्त तापलेला सूर्यनारायण! आणि जवळचीं ओसियामाता बघून वाळवंट बघायला गेलो पण दिवस थोड़ा उतरल्यावरच निघायची हिम्मत केली . एक गोष्ट लक्षात आली. प्रचंड तापमान आणि पाण्याचे दुर्भिक्ष! पण लोक रड़त बसत नाहीत. ज़ेव्हा केव्हा पाऊस येतो तेव्हा जे काही पिक घेतात, ते वाळवून ठेवतात आणि वर्षभर पुरवतात. तिथल्या एका दुकानात अशा खुप प्रकारच्या भाज्या सुकवलेल्या विक्रिस होत्या, भेंडी, गवार, मेथी, कोथिंबिर, विविध प्रकारच्या शेंगा…. कान्हा ला भर उन्हात गेलो कारण म्हणे प्राणी जास्ती दिसतात, ऊन्हामुळे. कसला रखरखाट तो!! अरे देवा! मात्र ख़रच प्राणी खुप दिसले. तसेच नवेगाव अन नागझीरा. ऐन ऊन्हाळयात गेलो. पण ख़रच त्या मुक्या जनावरांची परिस्थिति फ़ार कठीण होते ऊन्हानी. पाणवठे आटतात. सूर्य आग ओकत असतो अगदी. कधीतरी थोड़े कष्ट आपणही घेउन बघायला काय हरकत आहे न?

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments