पत्र क्र १६
माझ्यासाठी खरेदी हां निव्वळ व्यवहार न राहता अनेक वेळा भावनिक भाग बनुन जातों. त्यात अनेक अनावश्यक वस्तु पण घेतल्यात मी अनेक़दा, पण आपली छोटीशी कृती ज़र एखाद्याला मदतीची ठरत असेल तर मला त्यात काही ग़ैर...
जगाच्या पाठीवर … कधीतरी कुठेतरी पत्र क्र १६ माझ्यासाठी खरेदी हां निव्वळ व्यवहार न राहता अनेक वेळा भावनिक भाग बनुन जातों. त्यात अनेक अनावश्यक वस्तु पण घेतल्यात मी अनेक़दा, पण आपली छोटीशी कृती ज़र एखाद्याला मदतीची ठरत असेल तर मला त्यात काही ग़ैर वाटत नाही. मग ताहराबाद ला मी कधी १० किलो डाळींब घेते तर चाँपाच्या माझ्या विणकर मित्राकड़ुन जास्तीच्या कोसाच्या वस्तु. मी मजेत ते पण ख़ुश. काही विक़्रेते नेहेमीचे तर काही कधीतरी भेटुन पण कायमचे स्मरणात राहिलेले. बाली च्या एका समुद्रकिनारी असलेली अशीच रंगीबेरंगी बाज़ारपेठ. संध्याकाळ हातपाय पसरत होती. हवा छान. आम्ही मजेत फिरत होतों. बालीला प्रामुख्याने हिंदू वस्ती. आणि हिंदी सिनेमे, टीवी सीरियल फ़ार लोकप्रिय. हिंदी सिनेमा चे डायलॉग ते लोक शब्दनशब्द बरोबर म्हणत होते. मला बघुन , तू कुठुन आलीस? असे विचारत बऱ्याच जणी जमल्या. मग गप्पा सुरू. मुंबईहुन आलीय सांगीतल्या वर फ़ार ख़ुश झाल्या. म्हणे, मग तू शाहरुख़खान आणि लता मंगेशकर दोघांनाही रोज़च भेटत असशील न? म्हटल, का ग? तर त्यातली एक म्हणते, अग माझ्या मूलीला शाहरुख़ शी लग्न करायचे आहे, आमचा धर्म वेगळा असला न तरी चालेल, पण तू मध्यस्थी कर ह. आता काय बोलावे? तेवढ्यात दूसरी म्हणते, मलाही मुलीला भारतातच द्यायचे आहे. वा, का ग? तर तिचे उत्तर ऐकुन हसावे का रडावे सुचेना. “तुम्हा भारतीय स्त्रियांचे आयुष्य अगदी आरामाचे असते बघ. सकाळीच उठावे, मस्त मेकप करावा, दागदागिने घालावे, भारी भारी कपड़े, वा!! घरात सगळ काम करायला नोकरचाकर, सुखीच जीवन ग. आम्ही बघ किती कष्ट क़रतो ते”. “अग, आम्ही पण खुप काम करतो ग” मी सांगायचा प्रयत्न केला पण छे, सिनेमात आम्ही सगळ बघितलय म्हणे. युगांडा चा “तो” पण असाच लक्षात राहिला. तिथल्या समाजव्यवस्थेप्रमाणे घरच्यांनी कधीच सोडुन दिलेला. मग व्यसनाधिन. अनेक तरुण विविध व्यसनाच्या आहारी. त्यांना त्यातुन बाहेर काढ़ून, योग्य मार्ग दाखवण्याचे मोठे काम तिथल्या रोटरी ने केले. त्यातलाच एक हां. काळयाकभिन्न चेहऱ्यावर अतिशय बोलके डोळे. वय साधारण पंचवीस असेल. ड्रग्स मधुन बाहेर आलेला. आणि केळयाच्या झाडाच्या तंतु पासून सुंदर वस्तु बनवत होता. मी स्वतः पैसे कमवुन तुझ्या घरी येइन म्हणाला. त्याच्या ठायी आलेला आत्मविश्वास मला आजही आठवतो. कठीण परिस्थितिवर मात करत स्वभिमानाने जगणारे वीयट्नाम मधले असेच काही लोक. अमेरिकेने तिथल्या शेतांवर एजेंट ऑरेंज हे केमिकल फ़वारले. तिथल्या आजच्या पिढीमधे पण अनेक व्यंग दिसतात. खुप कठीण आयुष्य आहे त्यांचे. पण त्यातही जमेल ती कला आत्मसात् करत ते स्वतःसाठी कमवत आहेत. त्यांच्या सारख्या इतर पिडीताना मदत पण करत आहेत. हो चि मिन्ह सिटी मधले संग्रहालय बघताना त्या लोकांचि भेट झाली. एका दालनात ह्या एजेंट ऑरेंज चीं माहिती देतात. ती बघूनच आपण हलंतों. आणि पुढच्या दालनात त्यांच्या पुनर्वसनाचे जें कार्यक्रम आहेत त्याची झलक बघायला मिळते. त्यातच एक जण कागदाचे , क्विलिंग चे अनेक सुंदर नमुने बनवत होता. हाताला दोन दोन बोटे, एकच डोळा, अगदी किरकोळ शरीरयष्टी. बघता क्षणी माझे डोळे वाहू लागले. अर्थात् ते त्याला दिसणारच नव्हते. तो त्याचे काम करत होता. एरव्ही सतत डॉलर चे गणित करणारी मी, त्याच्याकडे होत्या त्या वस्तु घेउन निघाले.
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.