पत्र क्र १४

देश तेवढ्या कला!! आणि मला पण हस्तकलेच्या वस्तु जास्त आवड़तात, ती वस्तु घडवणारे हात अतिशय सुंदर वाटतात मला. किती तरी प्रकार! भारतात ईशान्येकडे बांबुच्या वस्तु असतात हे आपल्याला ढोबळमानाने माहित असते ....

कीर्ती वडाळकर
||2 min read

जगाच्या पाठीवर ... कधीतरी कुठेतरी पत्र क्र १४ देश तेवढ्या कला!! आणि मला पण हस्तकलेच्या वस्तु जास्त आवड़तात, ती वस्तु घडवणारे हात अतिशय सुंदर वाटतात मला. किती तरी प्रकार! भारतात ईशान्येकडे बांबुच्या वस्तु असतात हे आपल्याला ढोबळमानाने माहित असते . पण त्रिपुरा चा एक कलाकार मी आज ही विसरली नाही आहे. बांबुचे अति बारीक तास काढ़ून त्यांना गुंफत तों सुंदर दागिने घडवत होता. फ़ारसे कोणी घेत नव्हते अगदी कमी किम्मत असुन. मी मात्र घेतले आणि आज बघताना वाटते त्याचा पत्ता तरी घ्यायला हवा होता. राजस्थानात क़ापडावर रंगकाम किती प्रकारात करतात आणि किती सुंदर!! बाटिक, शिबोरि, बांधनी, अजरख डोळे दीपवणारे कपड़े सगळे ! आणि बहुतेक ठिकाणी ही सगळी कला बायकाच करतात. जोधपुर जवळ असेच एका वर्कशॉप मधे गेलो होतों. काही बायकाच ते चालवत होत्या. बहुतेक जणी कमीतकमी शिकलेल्या. पण हातात आलेल्या नमून्याप्रमाणे क़ापडाला दोरे गुंडाळत होत्या. आणि एवढा मोठा क़ापडाचा पसारा थोड्याच वेळात अगदी छोटा होऊन जात होता. मग भाज्यांपासून काढ़लेल्या रंगात बुड़वून , सुकवून वस्तु तयार!! किती घेऊ न किती नको होउन जाते. काही लोकप्रिय पर्यटन स्थळी हल्ली परदेशी वस्तुंच्या बाज़ारपेठा खुप दिसतात. पण त्यात फ़ारशी मज़ा नाही. काही वर्षापूर्वी अरुणाचल ला गेलो होतों. तेव्हा लक्षात आले. अनेक छोट्या ग़ावामधुन चीनी वस्तु मूबलक प्रमाणात होत्या आणि अत्यंत स्वस्त पण. तेव्हा रस्तेच नव्हते तिकडे फ़ारसे तर आपल्या वस्तु पोचणार कशा? काही वर्षापासून सगळीच कडे चीनी वस्तुंचे आक्रमण झालेले लक्षात येते. २५ वर्षापूर्वी नैनीताल वगेरे भागात सुंदर कलाकुसरीच्या वस्तु मिळत. हातानी वीणलेल्या लोकरीच्या वस्तु मिळत. लाकडी वस्तु मिळत. अलिकडे गेलो तर हस्तकलेचीं जागा चीनी बनावटीच्या वस्तुंनी घेतलेली दिसते अरुणाचल आपल्याला दुर्गम आणि चीनी वस्तु मात्र सहज पोचायच्या तिथे. आणि क़ीमती तर किती? एक चांगली छत्री, जी आपल्याला साधारण ३००/३५० ला मिळेल ती ५० रूपयाना सहज उपलब्ध! बाकी ही वस्तुँची हिच कथा! दार्जिलिंग हुन असेच नेपाळी बाज़ार दाखवायला नेतात, चीनी वस्तुनी भरलेला. धारचुला हुन पुल क्रॉस करुन नेपाळमधे जाता येत. पलिकड़े सगळा बाज़ार. चालत परदेशी पोचण्याची मज़ा. बाज़ार मोठा आहे. पण मन खरेदीला तयारच होत नाही. तिथुन जवळच असलेल्या जौलजीबी ग़ावात त्या भागातली मोठी जत्रा भरते. १०० वर्षापेक्षा अधिक काळ ती भरतेय. भारत, नेपाळ आणि चीन तिन्ही देशाचे लोक स्टॉलस लावतात. खुप रंगित. विविध खेळ, स्पर्धा अस सगळ असते आणि दूरदुरून लोक येतात आनंद घ्यायला. सुगिच्या दिवसात भरणारी ही जत्रा, लोक वाट बघत असतात. आम्ही गेलो तेव्हा बाज़ार तर होता पण विविध धान्याचा. काही असो मला ते ग़ावाचे नावच खुप आवडले, “जौलजीबी”!

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments